दिवाळीतली पहाट || दिवाळीतील मराठी कविता
दिवाळीतल्या खास दिसाला
खेड्यामधली पहाट झाली
बाजा-सनई दुरुन वाजे
घरात किनरी सुरु जाहली
खेड्यामधली पहाट झाली
दिवाळीतल्या प्रमुख दिसाला
गार भरारा वाहे वारा
साथ तयाची आंघोळीला
दिवाळीतल्या प्रमुख दिसाला
खेड्यामधली पहाट झाली
बकऱ्यांच्या लेंड्यांची घमघम
पालांमध्ये बघा पसरली
दिवाळीतल्या प्रमुख दिसाला
खेड्यामधली पहाट झाली
शिळ्या भाकरींच्या कुटक्यांची
शंकरपाळी खाती इवली
दिवाळीतल्या प्रमुख दिसाला
खेड्यामधली पहाट झाली
फराळ उष्टा चिमणी आणी
चोच उघडती खाया पिल्ली
वाड्यावरती आग उधळण्या
दिवाळीतली पहाट रमली
खोपटात पेटेना अग्नी
आगडबीची काडी सरली
दिवाळीतल्या प्रमुख दिसाला
खेड्यामधली पहाट झाली
झुंजुरक्याच्या फार अगोदर
शेणाची ये शिरी टोपली
दिवाळीतल्या दोन दिसांची
खेड्यामधली पहाट झाली
खोपटात ती नवीन नव्हती
आली! आली!, गेली! गेली!!
ITS VERY FANTASTIC
ردحذفإرسال تعليق